Tuesday, 15 March 2016

अकरा वर्षांची मुलगी राहते वाघ-सिंहांबरोबर

रियाध
सौदी अरेबियातील मदावी अल अनजी ही मुलगी फक्त 11 वर्षांची आहे. मात्र तिचे मित्र जरा वेगळे आहेत. एक सिंह तिचा खास दोस्त आहे. तिला चित्त्यासोबत झोपी जाणे आवडते. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. वाचून जरा धक्का बसला ना? कारण वाघ, सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबत राहणे तर दूरच त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही.
ही 11 वर्षीय चिमुरडी या प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात त्यांची भीती वाटत नाही. विशेष म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत. ती त्यांच्यासोबत एकाच खोलीत राहते. अनजीचे म्हणणे आहे की, ती या प्राण्यांशिवाय राहूच शकत नाही. या तिघांवर माझे खूप प्रेम आहे आणि त्यांच्याशिवाय मला झोप येत नाही. अनजीला तिच्या वडिलांनी अशाप्रकारे प्राण्यांसोबत राहण्याचे विशेष ट्रेनिंग दिले आहे. मात्र, अनजीने दुसर्‍या मुलांना इशारा दिलाय की, अशाप्रकारे त्यांनी हा प्रयोग करू नये. कारण तिला याचे खास ट्रेनिंग मिळाले आहे.

जुळ्या बाळांचे दोन वेगवेगळे पिता!

नॉम पे
जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील वेगवेगळे हे ऐकायला विचित्र वाटतं ना... वैद्यकीय दृष्ट्याही हे कसं शक्य आहे, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, पण हे शक्य झाले व्हिएतनामच्या होआ बिन्थ प्रांतात. येथील जुळ्या मुलांपैकी एकाचे जाड आणि कुरळे केस आहेत तर दुसर्‍या मुलाचे केस पातळ आणि सरळ आहेत. 
हॉस्पिटलने आपले एक मूल बदलले आहे, असे या मुलांच्या आई आणि वडिलांनी वाटत होते, त्यामुळे त्यांनी  त्याची डीएनए चाचणी केली. त्यात ही धक्कादायक बाब समोर आल्याचे व्हिएतनाम न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ही डीएनए टेस्ट हानोईच्या सेंटरमध्ये करण्यात आले. त्यात निष्पन्न झाले की या दोघांची आई एक आहे. तर 34 वर्षीय वडिलांना समजले की, या दोघांपैकी केवळ एकच मुलगा आपला आहे. बायपॅट्रनल मुलं ही खूप दुर्मीळ घटना आहे. अशा प्रकारे ही पहिला घटना आहे जी व्हिएतनाममध्ये घडली आहे. महिलेच्या गर्भातील अंडाणू ही 12 ते 48 तास जगतात. तर पुरुषाचे शुक्राणू हे 10 दिवस जगू शकतात. त्यामुळे या महिलेने दोन व्यक्तींशी संभोग केल्यामुळे दोन अंडाणू फलित झाली आणि त्यातून दोन जुळे मुले जन्माला आली.
- See more at: http://www.pudhari.com/news/visvsanchar/22568.html#sthash.zSvEDqZX.dpuf

चीनमध्ये चार पायांची कोंबडी!

बीजिंग :     चिन्यांच्या अजब देशातील आहारही किती अजब असतो, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. साप, बेडूक यांच्यासारखे परस्परांचे शत्रू चिन्यांच्या पोटात एकत्र सुखनैव नांदत असतात. तोंडी लावायला झुरळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतातच. आता अशा चीनमध्ये एका कोंबडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. चीनमधील शाँगडाँग येथील एका शेतात तब्बल चार पायांची कोंबडी पाहायला मिळाली. ही कोंबडी पाहून लोक घाबरले आणि याचे मांस खाण्यालायक आहे की नाही यावर चर्चा सुरू झाली!   यासंदर्भात चीनच्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार ही कोंबडी या शेतातली नाही; पण ती झू झैनू या शेतकर्‍याच्या मुलीला परिसरात सापडली. या कोंबडीला दोन नाही चार पाय आहेत. झू यांनी या विचित्र दिसणार्‍या पक्षाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आता या कोंबडीला पाहायला लोकांची रांग लागली आहे. ही कोंबडी एक महिन्यांची असून ती आपल्या दोन पायांनी पळू शकते. ती किती दिवस जगेल हे सांगू शकत नाही, असेही शेतकर्‍यांनी सांगितले. कोंबडीचे चार पाय आहेत याकडे अधिक लक्ष देण्याऐवजी अनेक चिन्यांना चारही लेग पीस खाण्यायोग्य असतील की नाही, हा विचार आधी आला! - See more at: http://www.pudhari.com/news/visvsanchar/23358.html#sthash.Wamv5ToW.dpuf

पंधरा दिवस जमिनीखाली राहूनही ठणठणीत!

मधेपुरा : योगसामर्थ्य हे तर्काच्या पलीकडचे असते यात शंकाच नाही. हिमालयातील योगी स्वामी राम यांनी युरोप-अमेरिकेत जाऊन योगसाधनेच्या अतर्क्य सामर्थ्याचे जाहीर प्रदर्शन केले होते. नाडीचे ठोके, शरीराचे तापमान वगैरे ज्या गोष्टींवर मानवी मनाची सत्ता चालत नाही अशा गोष्टीही त्यांनी योगसामर्थ्याने नियंत्रित करून दाखवल्या होत्या आणि पाश्‍चात्त्य डॉक्टरांना थक्क केले होते. अर्थात योगाच्या नावाखाली भोंदुगिरी करणारेही काही कमी नाहीत. देशाच्या उज्ज्वल परंपरेला आपण कलंक फासत आहोत याचे भान अशा लोकांना राहत नाही. मात्र, अधूनमधून यौगिक सामर्थ्याची काही उदाहरणे समोर येत असतात. बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील बाबा प्रमोद यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. तब्बल 15 दिवस जमिनीखाली राहूनही बाबा प्रमोद जिवंत राहिल्याने सर्वत्र या चमत्काराची चर्चा होत आहे. बाबा प्रमोद यांनी 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी चौसा ठाण्याच्या हद्दीतील भटगामा गावात समाधी घेतली होती. बाबांच्या समाधीसाठी 10 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 15 फूट खोल खड्डा खणला होता. बाबा या खड्ड्यात बसल्यानंतर त्यांच्या भक्तांनी हा खड्डा वरून बांबूच्या पट्ट्या लावून आणि वर माती टाकून बंद केला होता. अधिकार्‍यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा खड्डा खणण्यास सुरुवात केली. पोलिसांचे पथक तसेच डॉक्टरांचे एक पथकही तेथे हजर होते. अखेर या बाबांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर या कोंदट, गुदरमरण्यास लावणार्‍या छोट्याशा जागेत पंधरा दिवस राहिल्याच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. - See more at: http://www.pudhari.com/news/visvsanchar/23960.html#sthash.PE1yT0Zq.dpuf

‘ई-मेल’चा जनक... (अतुल कहाते)

इलेक्‍ट्रॉनिक मेल (ई-मेल) ही बाब अनेकांच्या आज सवयीची झालीय. १९७१ मध्ये रे टॉम्लिन्सन यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढलं. सुरवातीला त्यांच्या या तंत्रज्ञानाची दखल घेतली गेली नाही; पण नंतर मात्र अनेक जण ई-मेलचा वापर करू लागले. मात्र हा प्रवास सहज झालेला नाही. अनेक जणांच्या योगदानातून ई-मेलचं आजचं रूप तयार झालंय. या तंत्रज्ञानाचे जनक टॉम्लिन्सन यांचं नुकतचं ( ५ मार्च) निधन झालं. त्यानिमित्त...

इलेकट्रॉनिक मेल (ई-मेल) हे तंत्रज्ञान उदयाला येण्यापूर्वी ‘आर्पानेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंटरनेटचा वापर दोन संगणकांमधली देवाणघेवाण या एकाच गोष्टीसाठी केला जाई. पण ही देवाणघेवाण दोन संगणकांमध्येच व्हावी असं काही नाही; या तंत्रज्ञानानं दोन माणसांमध्येसुद्धा संवाद होऊ शकतो अशी टूम निघाली. ई-मेलचं तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांच्या वापराच्या दृष्टीनं सुरवातीला क्‍लिष्ट आणि कटकटीचं होतं पण त्यात सुधारणा होत गेल्या आणि नवनव्या पद्धती निघाल्या. जगातली पहिली आधुनिक स्वरूपाची ई-मेल बीबीएन कंपनीत काम करणाऱ्या रे टॉम्लिन्सन यांनी १९७१ मध्ये ऑक्‍टोबर महिन्यात पाठवली असं मानलं जातं. त्यांनीच इमेलच्या तंत्रज्ञानाला जन्म दिला. न्यूयॉर्कमध्ये १९४१ मध्ये टॉम्लिन्सन यांचा जन्म झाला. १९६३ मध्ये विज्ञान शाखेतलं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पुढं एमआयटीत आपलं उच्चशिक्षणही पूर्ण केलं. १९६७ मध्ये ते बीबीएन कंपनीत रुजू झाले. तिथं त्यांनी टेलनेट तसंच तत्सम प्रकारच्या तंत्रज्ञानांवर काम केलं. त्यानंतर आर्पानेटवर एकीकडून दुसरीकडं संगणकाच्या फाईल्स पाठवू शकणारं तंत्रज्ञान बनवायची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. हे काम करत असतानाच आर्पानेटचा वापर करून एकीकडून दुसरीकडं संदेश किंवा निरोप पाठवायची युक्ती त्याला सुचली. त्यावर त्यानं काम केलं आणि त्यातून ई-मेलचा जन्म झाला. गंमत म्हणजे जेव्हा टॉम्लिन्सन यांनी आपल्या एका सहकाऱ्याला आपल्या या कामाविषयी सांगितलं तेव्हा त्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय थंड होता. ई-मेलचा वापर कुणी करेल असं त्या सहकाऱ्याला अजिबातच वाटलं नाही. तसंच टॉम्लिन्सन नसत्या उचापाती करत असल्याचं आपलं मत असल्याचंही त्या सहकाऱ्यानं टॉम्लिन्सनला सुनावलं. कहर म्हणजे ई-मेलचा शोध लागून अनेक वर्षे उलटून गेल्यावर टॉम्लिन्सन यांनी ई-मेलचा शोध लावला असल्याचं जगाच्या लक्षात आलं.


बीबीएन कंपनीत काम करताना रे टॉम्लिन्सन यानं ‘ई-मेल’चं तंत्रज्ञान विकसित केलं. 

आज आपण आपल्या संगणकाच्या कीबोर्डवरच्या @ या चिन्हाचा वापर इमेलच्या ॲड्रेसमध्ये अगदी सहजपणे करतो. या चिन्हाचा वापर करायची युक्तीही टॉम्लिन्सन यांचीच होती. पण या चिन्हाचा शोध मात्र आपण लावलेला नसल्याचं ते प्रांजळपणे मान्य करतात. या चिन्हाची गंमत म्हणजे अनेक भाषांमध्ये ते वेगवेगळ्या अर्थानं वापरलं जातं. स्वीडिश भाषेत त्याचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ ‘हत्तीचा कान’ असा होतो. कदाचित हे चिन्ह हत्तीच्या कानासारखं दिसतं. म्हणून तसं म्हटलं जात असावं फ्रेंच भाषेत या चिन्हाचा अर्थ ‘अज्ञात गोष्ट’ असा आहे. डच भाषेत हे चिन्ह ‘माकडाची शेपटी’ या अर्थानं वापरलं जातं. इटालियन भाषेत त्याचा अर्थ ‘गोगलगाय’ असा होतो. हे चिन्ह पोटात पाय घेऊन बसलेल्या गोगलगायीसारखं दिसत असल्यामुळे असं असावं. इंग्रजी भाषेत मात्र या शब्दाचा वापर ‘एखाद्या गोष्टीचा दर’ अशा अर्थानं होतो. उदाहरणार्थ ५ पेन्सिली @ प्रत्येकी ५ रुपये बरोबर एकूण २५ रुपये असं मानलं जातं. टॉम्लिन्सननं हे चिन्ह ई-मेलमध्ये माणसाचं नाव आणि त्याच्या काम करायच्या ठिकाणाचं किंवा त्याला ई-मेलची सुविधा पुरवणाऱ्या कंपनीचं नाव जोडण्यासाठी वापरलं. उदाहरणार्थ akahate आणि Gmail.com जोडून akahate@gmail.com असा ई-मेल ॲड्रेस किंवा ई-मेल आयडी तयार होतो. एका मुलाखतीत ई-मेलचा शोध आपल्याला १९७२ मध्ये लागला असं टॉम्लिन्सन यांनी म्हटलं होतं; पण नंतर त्यांनीच ही माहिती चुकीची असून, १९७१ मध्ये आपण इमेलच्या वापर प्रथम केला असं सांगितलं.

१९७१ ते १९७५ या काळात इंटरनेटची मूळ रचना तयार करणाऱ्या आर्पा कंपनीचा संचालक आणि भौतिकशास्त्रात प्रवीण असलेला स्टीफन ल्युकासिक हा इमेलचा मोठा चाहताच बनला. त्यामुळं इमेलची लोकप्रियता वाढतच गेली. १९५० च्या दशकात बीबीएन कंपनी आणि एमआयटी इथं आपल्या कारकीर्दीची सुरवात झाल्यानं ल्युकासिकला संगणकांविषची खूप कुतूहल वाटायचं. त्यामुळं आर्पामध्ये असतानाही संगणकांविषयीच्या संशोधनाच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्यात तो नेहमी पुढे असे. त्याला सतत आपल्या कार्यालयात फेऱ्या मारून सहकाऱ्यांशी गप्पा मारायला आवडायचं. यातूनच ल्युकासिकनं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान पुढं नेलं.

ई-मेलचा शोध लागल्यावर सुरवातीच्या काळात वेगवेगळ्या गमतीजमती घडायच्या. लोकांना आपण संगणक वापरून एकमेकांना संदेश पाठवू शकतो याचं इतकं अप्रुप वाटायचं की ते कित्येकदा काहीही कारण नसताना एकमेकांना ई-मेल्स पाठवायचे, त्यात त्यांना थ्रिल वाटायचं. काही माणसांना मात्र अशा प्रकारे संगणकाच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना संदेश किंवा निरोप पाठवणं अजिबात आवडायचं नाही. त्यामुळं कधीकधी एखाद्या माणसानं आपल्या सहकाऱ्याला ई-मेलनं प्रश्‍न विचारला तर त्याचं उत्तर द्यायला तो सहकारी सरळ उठून पहिल्या माणसाच्या टेबलापाशी येई. थोडक्‍यात म्हणजे अनेक जणांच्या दृष्टीनं ई-मेल हा एक ‘कल्चर शॉक’च होता.

त्या काळात अजून पर्सनल कम्प्युटरसुद्धा अस्तित्वात आलेला नसल्यामुळं लॅपटॉप, टॅब्लेट पीसी, मोबाईल हे सगळं कुणाच्या स्वप्नातसुद्धा नसावेत. पण ल्युकासिककडं साडेतेरा किलो वजनाचा एक ‘पोर्टेबल’ संगणक होता. सगळीकडे प्रवास करत असताना ल्युकासिक आपल्याबरोबर हे धूड घेऊन जायचा. तसंच या जड संगणकाला ‘अकौस्टिक कप्लर’ नावाचं यंत्र जोडून तो जाता-येता आपल्याला आलेल्या ई-मेल्स वाचायचा आणि त्यांना तिथून उत्तरंही लिहायचा. त्या काळाच्या मानानं हा सगळा प्रकार एकदम अत्याधुनिकच होता असं म्हणायला हवं. ई-मेलच्या सुविधेमुळं जिथं असेल तिथून ल्युकासिकला आर्पामधल्या कामाच्या प्रगतीविषयी जाणून घेता येई. ई-मेलमुळं ल्युकासिक इतका प्रभावित झाला की त्यानं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना ई-मेलचं तंत्रज्ञान वापरायचे आदेश देऊन टाकले. त्या सहकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या माणसांना तेच सांगितलं. असं करत करत आर्पामध्ये ई-मेलचा वापर चांगलाच वाढला. ल्युकासिक त्याचा एक सहकारी रॉबर्टसला कुठलीही माहिती विचारली की तो भराभर ती ल्युकासिकला पुरवायचा. त्यामुळं ल्युकासिक त्याच्यावर चांगल्यापैकी अवलंबून राहू शके. पण तो हे सगळं कसं जमवून आणतो याविषयी ल्युकासिकला विलक्षण कुतूहल वाटत असे. यामुळं त्यानं एकदा रॉबर्टसच्या कामाच्या पद्धतीचा अभ्यास केला. ल्युकासिकनं कुठलीही माहिती मागितल्यावर रॉबर्टस आपल्या सहकाऱ्यांना संबंधित विषयावरच्या ई-मेल्स तातडीनं पाठवायचा आणि त्यांनी उत्तरं पाठवली की ती सगळी माहिती एकत्र करून ल्युकासिकला लगेचच पाठवून द्यायचा. त्यामुळे रॉबर्टसचं काम विलक्षण वेगानं होतं ही गोष्ट ल्युकासिकच्या लक्षात आली.

नंतर १९७३ मध्ये ल्युकासिकनं काही जणांना आर्पानेटवर फाईल्स तसंच ई-मेल्स अशी माहिती किती प्रमाणात पाठवली जाते याचा अभ्यास करायला सांगितलं. या अभ्यासातून आर्पानेटवरच्या संदेशवहनामधली ७५ टक्के माहिती इमेलच्या संदेशांशी संबंधित असल्याचं दिसून आलं. आता ई-मेल्स पाठवायचं काम तसं सोपं झालं होतं. पण आपल्याला आलेल्या ई-मेल्स वाचणं आणि त्यांना उत्तर देणं हे काम मात्र अजूनही अवघडच होतं. कारण आपल्याला समजा दोन ई-मेल्स आलेल्या असतील तर त्या सलग, कुठलंही फॉरमॅटिंग न होता संगणकाच्या स्क्रीनवर किंवा प्रिंटरवर उमटायच्या. त्यामुळं इमेल वाचताना अक्षरांचा पूरच आला आहे की काय असं वाटायचं. तसंच समजा आपल्याला आलेली  ई-मेल वाचण्यात रस नसेल आणि ती न वाचता दुसरी ई-मेल आपल्याला वाचायची असेल तर तशी सोयसुद्धा नव्हती. पहिल्या ई-मेलपासूनच वाचनाला सुरवात करणं भाग असे. तसंच आलेल्या ई-मेल्सना उत्तरं लिहिण्यासाठी आता जसं ‘रिप्लाय’चं बटन असतं तसं त्या काळी नसायचं. त्यामुळे आलेल्या ई-मेल्सना उत्तरं लिहिण्यासाठी परत एक नवी इमेल लिहावी लागे. या सगळ्यामुळे ल्युकासिक जरा वैतागूनच गेला. त्यानं नेहमीप्रमाणे रॉबर्टसला यावर उपाय करायला सांगितलं. नेहमीच्याच सफाईनं रॉबर्टसनं काही खटाटोप करून नको असलेल्या इमेल्स डिलिट करणं, आलेल्या इमेल्सची विभागणी करणं इत्यादी सोयी असलेला प्रोग्रॅम एका सहकाऱ्याकडून लिहून घेतला. ई-मेल्सच्या जंजाळाशी सामना करण्यासाठी लिहिण्यात आलेला हा पहिलाच प्रोग्रॅम असावा. त्यातून स्फूर्ती घेऊन असे आणखी प्रोग्रॅम्स इतरांनी लिहिले. इमेलच्या संदर्भातले नियम ठरवताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ व्हायचे. एका माणसानं ई-मेल ॲड्रेसमध्ये @ हे चिन्ह टाकण्याला विरोध केला.
त्याऐवजी दुसरं कुठलं तरी चिन्ह वापरा असं त्या माणसाचं म्हणणं होतं. दुसऱ्या एका माणसानं हेच चिन्ह वापरलं पाहिजे असा आग्रह धरला खरा; पण हे चिन्ह माणसाचं नाव आणि वेबसाईटचं किंवा कंपनीचं नाव यांच्यामध्ये न येता वेगळीकडेच असलं पाहिजे असं मत मांडलं. त्यातला आणखी एक गोंधळ म्हणजे ‘मल्टिक्‍स’ नावाच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये @ या चिन्हाचा वापर ज्या ओळीवर सध्या माणूस टायपिंग करत असेल त्या ओळीतला उरलेला सगळा मजकूर काढून टाकण्यासाठी व्हायचा. त्यामुळे मल्टिक्‍स ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या संगणकाचा वापर करून कुणी दुसऱ्या कुणाला ई-मेल लिहीत असेल तर त्यासाठी ई-मेल ॲड्रेस टाईप करत असताना कीबोर्डवर @ हे चिन्ह टाईप केलं की त्या ओळीतला पुढचा सगळा मजकूर गायब केला पाहिजे असा अर्थ लावला जायचा. त्यामुळं ई-मेल ॲड्रेस पूर्णपणे टाईप करणं शक्‍यच व्हायचं नाही. उदाहरणार्थ समजा ई-मेल लिहिणाऱ्या माणसाला akahate@gmail.com या ई-मेल ॲड्रेसवर इमेल पाठवायची असेल तर तो माणूस हा ई-मेल ॲड्रेस टाईप करायला लागेल. पण त्यानं हे काम करताना @ हे चिन्ह टाइप करताच त्या माणसाला या चिन्हानंतरचा मजकूर टाइप करणं शक्‍यच व्हायचं नाही. कारण त्यानं या चिन्हानंतर कोणताही मजकूर टाइप केला की संगणक तो मजकूर लगेचच पुसून टाकायचा. यामुळे मल्टिक्‍स ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर ई-मेल लिहिण्यासाठी करणारे लोक मनातून इमेलच्या जनकाला म्हणजेच टॉम्लिनसला खूप दूषणं द्यायचे.

ई-मेल अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झालेली असली तरी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर नंतरच सुरू झाला. लोक इमेल किती वेळात वाचातत आणि तिला किती पटकन उत्तर देतात हे बघण्यासाठी डेव्ह क्रॉकरनं एकदा एक छोटा प्रयोग केला. त्यानं संध्याकाळी पाच वाजता सुमारे १३० जणांना एक इमेल पाठवून या ई-मेलचं उत्तर मागितलं. त्या इमेलमधल्या मजकुराला तसं काही महत्त्व नव्हतं. यातून क्रॉकरनं काढलेला निष्कर्ष तसा धक्कादायकच होता. कारण इमेल पाठवून जेमतेम दीड तास उलटल्यावर ७ जणांनी त्याच्या ई-मेलला उत्तर पाठवलं होतं. चोवीस तासांमध्ये तब्बल २८ जणांचं उत्तर आलं होतं. आजच्या युगात काही सेकंदांमध्ये किंवा मिनिटांमध्येच कदाचित एवढी उत्तरं येतील. पण १९८० च्याही आधी इतक्‍या जणांनी ई-मेल वाचून इतक्‍या लवकर उत्तर लिहिणं हे ई-मेलच्या येऊ घातलेल्या युगाची नांदी सांगणारंच होतं.

ई-मेलचा वापर वाढला तसा या माध्यमात आणखी जान ओतण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरू केला. ई-मेलमधला मजकूर खूपच कोरडा आणि तुटका वाटतो असं केव्हिन मॅकेंझी या इमेलचा वापर नव्यानं सुरू केलेल्या माणसाला वाटायचं. त्यामुळे मॅकेंझीनं इमेलच्या माध्यमातून माणसाच्या भावना, हालचाली, त्याचे हावभाव या गोष्टी पोचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं ठरवलं. त्यासाठी १२ एप्रिल १९७९ या दिवशी मॅकेझीनं ई-मेलमध्ये नेहमीच्या भाषेत समाविष्ट नसलेली काही चिन्हं वापरावीत अशी सूचना केली. नमुन्यादाखल त्यानं ः-) हे चिन्ह हसरी मुद्रा दाखवण्यासाठी वापरावी असं सुचवलं. म्हणजेच इमेल लिहिणाऱ्या माणसाला आपल्याला हसू येत असल्याचं पलीकडच्या माणसाला कळवायचं असेल तर तो हे चिन्ह वापरेल. या संदर्भात त्यानं ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकात वाचलेल्या एका लेखाचाही संदर्भ घेतला होता. मॅकेंझीनं आपली ही सूचना ई-मेलच्या ‘डिस्कशन ग्रुप’वर मांडली. एका तासाभरातच त्याला ‘तुझी सूचना थोडीशी बालिश प्रकारची वाटत असली, तरी ती अगदीच मूर्खपणाची नाही’ अशी प्रतिक्रिया मिळाली. एका माणसानं मॅकेंझीचं म्हणणं साफ खोडून काढताना विल्यम शेक्‍सपियरचा दाखला दिला. फक्त शब्दांची जादू वापरून शेक्‍सपियर सगळ्या प्रकारच्या प्रसंगांचं आणि भावनांचं वर्णन समर्थपणे करू शकत होता तर आपल्याला ही चिन्हं कशाला हवीत असा त्या माणसाचा सवाल होता. पण लवकरच हा विरोध मावळला आणि अनेक लोक आपल्या इमेल्समध्ये मजकुराबरोबरच या चिन्हांचा वापर करायला लागले. त्यात प्रामुख्यानं ः-) म्हणजे हसरी मुद्रा,  ;-) म्हणजे डोळा मारल्यासारखी खूण अशी चिन्हं वापरली जायची. अशा प्रकारच्या चिन्हाला आता ‘स्माईली’ किंवा ‘इमोटिकॉन’ म्हणून ओळखलं जातं. त्यामधला ‘इमोटिकॉन’ हा शब्द ‘इमोशन’ आणि ‘आयकन’ यांच्या एकत्रीकरणातून तयार झाला आहे. म्हणजेच ‘भावना व्यक्त करण्यासाठीचं चिन्ह’ असा त्याचा अर्थ होतो. आजच्या व्यवहारात अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या ई-मेलचा जनक आता जगात नाही !

प्रेमाची लढाई हरला, "अस्तित्वा'ची जिंकला..!


कोल्हापूर - ""एका मुलीवर माझं जीवापाड प्रेम. ती म्हणजे माझं सर्वस्व; मात्र माझ्या कुटुंबीयांना माझं प्रेमप्रकरण कळलं व त्यांचा लग्नाला विरोध झाला. तिच्या लग्नानंतर स्वत:चं अस्तित्व गमावल्यासारखं वाटू लागलं. मी अबोल झालो आणि मनात आत्महत्येचा विचार येऊ आला. काही जण भरत "बाद‘ झाला असे म्हणू लागले; पण एके दिवशी ही निराशा झटकून जागा झालो. जे झालं ते झालं असा विचार करून गेलेलं. "अस्तित्व‘ पुन्हा मिळवायचं, असं ठरवून टाकलं. मग थेट कोल्हापूर गाठलं व स्पर्धा परीक्षेचा मोठ्या जिद्दीने अभ्यास करू लागलो.‘‘ 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) परीक्षेत राज्यात चौथा आलेला भरत तुकाराम पाटील-आरूळकर सांगत होता. प्रेमाच्या लढाईत हरलो तरी चालेल; पण स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याच्या लढाईत जिंकलो, असाच संदेश तो देत होता. प्रेमवीरांनो, एक मुलगी म्हणजे आयुष्य नव्हे, आयुष्यात खूप काही करण्यासारखं असतं. त्यामुळे खचू नका. जिद्द ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे तो सांगत होता.
आरूळ (ता. शाहूवाडी) हे भरतचे गाव. त्याचे वडील माजी सैनिक. त्यांचा 1965 व 71च्या युद्धात सहभाग होता. काका ज्ञानदेव बाळा पाटील हे सेकंड मराठा लाइट इन्फंट्रीत होते. भरत सैनिकी घराण्याचा वारसदार. त्याचे शालेय शिक्षण विद्यामंदिर आरूळ, श्री शाहू हायस्कूल (शाहूवाडी), पन्हाळा विद्यामंदिरमधून झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तो एका मुलीच्या प्रेमात गुंतला आणि दोघांनी लग्न करायचे निश्‍चित केले. चांगल्या नोकरीसाठी भरतने एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात त्याच्या कुटुंबीयांना त्याचे प्रेमप्रकरण कळाले आणि त्यांनी लग्नाला नकारघंटा वाजवली. एमबीएची शेवटची सेमिस्टर सुरू असताना तिचं लग्न झालं आणि तो सैरभैर झाला. सहा महिने तो ताणतणावात राहिला आणि त्यानंतर त्याचा जिद्दीचा प्रवास सुरू झाला.
या आठवणी जाग्या करत भरत म्हणाला, ""प्रेमातील अपयशातून एके दिवशी जागा झालो आणि दुखावलेल्या मनात एक ठिणगी पेटली. एमपीएससीतून अधिकारी होऊन, गेलेली इज्जत परत मिळवायची, असाच मी निर्धार केला. या परीक्षेतून यश सहज मिळत नसल्याने, अनेकांचा राग ओढवून घेतला. अभ्यास सुरू केल्यानंतर पुन्हा सर्वांनी हा कामातून गेला, अशीच ओरड सुरू झाली; पण माझ्यामागे पुन्हा आई-वडील, बहीण शोभा, स्वाती, भावजी अशोक पाटील, सुरेश पाटील व सरदार शिंदे खंबीरपणे पाठीशी राहिले. सुरवातीला एमपीएससीचा अभ्यासक्रम कोणता, हेच माहीत नव्हते.
जॉर्ज क्रूझ, राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनातून अभ्यास कसा करावा हे कळत गेले. मला 2011 ला पीएसआयच्या अंतिम यादीत सोळा, तर 2012 ला एसटीआयच्या अंतिम परीक्षेत दोन गुण कमी पडले. राज्यसेवा पूर्व परीक्षेत एक गुण कमी पडला. गेल्यावर्षी पीएसआयच्या पूर्व व अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर फिजिकलची जोरदार तयार केली. राजू कावळे, पीएसआय विजय नाईक, अभिजित पारखे, विक्रम तासगावकर, एक्‍साईज इन्स्पेक्‍टर विशाल आळतेकर, सतीश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. अभिजित जाधव व जमीर मुल्ला यांनी अभ्यासाकरिता सहकार्य केले. त्यामुळेच आज पीएसआय होऊ शकलो.‘‘
भरत तुकाराम पाटील (रा. आरूळ, ता. शाहूवाडी)
शिक्षण - बी.एस्सी. केमिस्ट्री (गोखले महाविद्यालय)
एम.बी.ए. मार्केटिंग फायनान्स (सायबर)
एम.फिल. (शिवाजी विद्यापीठ)

अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत गेलो आणि त्यांनी कोणत्या अडचणींतून इतिहास घडवला, हे कळत गेले. आज प्रेमातील अपयशातून आत्महत्येकडे वळणारे अनेक तरुण आहेत. त्यांनी या थोर महापुरुषांची चरित्रे जरूर वाचावीत आणि आयुष्यात चांगल करण्यासाठी प्रयत्न करावा.‘‘
-भरत पाटील 

'त्याच्या' आत्मविश्‍वासाने नियतीलाही झुकविले!

जळगाव - किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि औषधी पोटात गेल्या... दुखणं वाढलं, तसा शरीरावर अजून औषधींचा मारा झाला... आजार बरा झाला; पण पोटात गेलेल्या औषधांसोबत नियतीनंही घात केला... "त्याला‘ संधिवातानं जखडलं. हळूहळू संधिवातानं संपूर्ण शरीरावरच कब्जा केला, शरीराची हालचाल बंद झाली. शरीर अंथरुणाला खिळले; परंतु, मेंदूनं नियतीवर मार करीत गती धरली, जणू शरीरातील संपूर्ण शक्ती मेंदूत एकत्रित झाली... 
"त्याच्या‘ दुर्दम्य आत्मविश्‍वासाचं "टॉनिक‘ मेंदूला मिळालं अन्‌ याच आत्मविश्‍वासाच्या बळावर तब्बल बारा वर्षांनंतर यंदा बारावीची संपूर्ण परीक्षा आणि आज शेवटचा पेपरही अंथरुणाला खिळूनच दिला. औषधांच्या निमित्तानं घात करणारी साक्षात नियतीनंही त्याच्या या आत्मविश्‍वासापुढं मान तुकविली. ही गोष्ट आहे, एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील 28 वर्षीय महेंद्र काशिनाथ लोहार या तरुणाची... 

कुणी अभ्यास झाला नाही म्हणून आत्महत्या केली, तर कुणी पेपर कठीण गेला म्हणून... कुणी नापास झाले म्हणून आत्महत्या केली, तर कुणी पालकांनी रागवले म्हणून... अशा विद्यार्थ्यांसाठी महेंद्रचा आत्मविश्‍वास आणि जिद्द मार्ग दाखवणारा दीपस्तंभ ठरला आहे. 

शहरातील गुजराल पेट्रोलपंपामागील अण्णासाहेब पाटीलनगरात राहणाऱ्या महेंद्रनं आजारावर मात करत, आज बारावीचा अखेरचा पेपर दिला. महेंद्र अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना त्याला संधिवात जडला, तो कायमचाच... परंतु त्यानं जिद्द नाही सोडली. इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाला गवसणी घातली आहे. पलंगावरूनच लॅपटॉप हाताळत त्यानं बारावीचा बहिःस्थ विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा अर्ज केला. आईनं बारावीच्या सर्व विषयांच्या पुस्तकांचं एक-एक पान स्कॅन करून महेंद्रला लॅपटॉवर पाहता येतील, अशी सोय केली आणि महेंद्रनं अभ्यास सुरू केला. ऑनलाइन अभ्यास करून, महेंद्रनं रायटरच्या मदतीने सर्व विषयांचे पेपर रुग्णवाहिकेत बेडवर पडूनच दिले. 

ऑनलाइन विद्यार्थी महेंद्रला बारावीचे पेपर देता यावेत, यासाठी त्याच्या वडिलांनी नाशिकच्या शिक्षण मंडळातून लेखी परवानगी आणली. शिक्षण मंडळाचे राज्य विभागीय सचिव बी. एस. सूर्यवंशी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले व महेंद्रला रुग्णवाहिकेत झोपून परीक्षा देण्याची परवानगी दिली. नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. सुर्वसे, प्रा. नेमिचंद जैन, केंद्रप्रमुख के. टी. पाटील, जी. आर. पाटील, एम. डी. चव्हाण, पर्यवेक्षक सुनील गरुड, महेंद्रचे रायटर अक्षय खिरडकर या सर्वांच्या सहकार्याने महेंद्रने यशस्वीरीत्या बारावी बोर्डाचे संपूर्ण पेपर दिले आहेत. बारावीनंतरचे पुढील शिक्षण "सायबर लॉ‘मध्ये करण्याची महेंद्रची इच्छा आहे. "सायबर क्राइम‘ या विषयात त्याची विशेष रुची असून, त्यातच पुढे करिअर करणार व शिक्षण सुरू ठेवण्याचा त्याचा मानस आहे.

ऑनलाइन कामातून कमाई महेंद्र बारा वर्षांपासून बेडवर पडून आहे. अशा अवस्थेतही त्याने हार न पत्करता आपल्या आजारावर मात करत, पैसे कमवायचे ठरविले. महेंद्रने आपल्या नावाचे ऑनलाइन सर्वर तयार केले आहे. कुठल्याही छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी लोगो तयार करणे, वेब पेज तयार करणे, ऑनलाइन जाहिरात टाकणे आदी कामे असली, की महेंद्रला संपर्क साधून ती केली जातात. पैशांचे सर्व व्यवहार ऑनलाइन बॅंकिंगने केले जातात. परिसरातील नागरिकांचे, नातेवाइकांचे कुठलेही ऑनलाइन काम महेंद्र करून देतो. अर्थात, त्याचे दोन टक्के कमिशन घेऊन महेंद्र हा स्वयंरोजगारातही पारंगत झाला आहे. 

आई-वडिलांनाही धीर... जिल्हा बॅंकेतील निवृत्त अधिकारी काशिनाथ लोहार व आई कुसुम लोहार यांचा महेंद्र एकुलता एक मुलगा आहे. आपल्या मुलाला झालेल्या आजाराने आई- वडील हताश झाले; परंतु महेंद्रनेच त्यांना हिम्मत दिली. आपल्यापेक्षाही वाईट परिस्थिती असणारे लोक त्यांच्या जीवनात कशा प्रकारे यशस्वी आहेत, ते इंटरनेटच्या माध्यमातून दाखवीत त्यानेच उलट आई- बाबांना धीर दिला अन्‌ पुढची आपली वाटचाल निश्‍चित केली. 

आई-बाबा, हताश होऊ नका. मी जसा आहे, तसा आनंदी आहे. माझे असामान्य जीवनही मी सामान्यपणे जगू शकतो, हे मी माझ्या कामातून दाखवून देईन. 
महेंद्र लोहार