जळगाव - किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि औषधी पोटात गेल्या... दुखणं वाढलं, तसा शरीरावर अजून औषधींचा मारा झाला... आजार बरा झाला; पण पोटात गेलेल्या औषधांसोबत नियतीनंही घात केला... "त्याला‘ संधिवातानं जखडलं. हळूहळू संधिवातानं संपूर्ण शरीरावरच कब्जा केला, शरीराची हालचाल बंद झाली. शरीर अंथरुणाला खिळले; परंतु, मेंदूनं नियतीवर मार करीत गती धरली, जणू शरीरातील संपूर्ण शक्ती मेंदूत एकत्रित झाली...
"त्याच्या‘ दुर्दम्य आत्मविश्वासाचं "टॉनिक‘ मेंदूला मिळालं अन् याच आत्मविश्वासाच्या बळावर तब्बल बारा वर्षांनंतर यंदा बारावीची संपूर्ण परीक्षा आणि आज शेवटचा पेपरही अंथरुणाला खिळूनच दिला. औषधांच्या निमित्तानं घात करणारी साक्षात नियतीनंही त्याच्या या आत्मविश्वासापुढं मान तुकविली. ही गोष्ट आहे, एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील 28 वर्षीय महेंद्र काशिनाथ लोहार या तरुणाची...
कुणी अभ्यास झाला नाही म्हणून आत्महत्या केली, तर कुणी पेपर कठीण गेला म्हणून... कुणी नापास झाले म्हणून आत्महत्या केली, तर कुणी पालकांनी रागवले म्हणून... अशा विद्यार्थ्यांसाठी महेंद्रचा आत्मविश्वास आणि जिद्द मार्ग दाखवणारा दीपस्तंभ ठरला आहे.
शहरातील गुजराल पेट्रोलपंपामागील अण्णासाहेब पाटीलनगरात राहणाऱ्या महेंद्रनं आजारावर मात करत, आज बारावीचा अखेरचा पेपर दिला. महेंद्र अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना त्याला संधिवात जडला, तो कायमचाच... परंतु त्यानं जिद्द नाही सोडली. इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाला गवसणी घातली आहे. पलंगावरूनच लॅपटॉप हाताळत त्यानं बारावीचा बहिःस्थ विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा अर्ज केला. आईनं बारावीच्या सर्व विषयांच्या पुस्तकांचं एक-एक पान स्कॅन करून महेंद्रला लॅपटॉवर पाहता येतील, अशी सोय केली आणि महेंद्रनं अभ्यास सुरू केला. ऑनलाइन अभ्यास करून, महेंद्रनं रायटरच्या मदतीने सर्व विषयांचे पेपर रुग्णवाहिकेत बेडवर पडूनच दिले.
ऑनलाइन विद्यार्थी महेंद्रला बारावीचे पेपर देता यावेत, यासाठी त्याच्या वडिलांनी नाशिकच्या शिक्षण मंडळातून लेखी परवानगी आणली. शिक्षण मंडळाचे राज्य विभागीय सचिव बी. एस. सूर्यवंशी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले व महेंद्रला रुग्णवाहिकेत झोपून परीक्षा देण्याची परवानगी दिली. नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. सुर्वसे, प्रा. नेमिचंद जैन, केंद्रप्रमुख के. टी. पाटील, जी. आर. पाटील, एम. डी. चव्हाण, पर्यवेक्षक सुनील गरुड, महेंद्रचे रायटर अक्षय खिरडकर या सर्वांच्या सहकार्याने महेंद्रने यशस्वीरीत्या बारावी बोर्डाचे संपूर्ण पेपर दिले आहेत. बारावीनंतरचे पुढील शिक्षण "सायबर लॉ‘मध्ये करण्याची महेंद्रची इच्छा आहे. "सायबर क्राइम‘ या विषयात त्याची विशेष रुची असून, त्यातच पुढे करिअर करणार व शिक्षण सुरू ठेवण्याचा त्याचा मानस आहे.
ऑनलाइन कामातून कमाई महेंद्र बारा वर्षांपासून बेडवर पडून आहे. अशा अवस्थेतही त्याने हार न पत्करता आपल्या आजारावर मात करत, पैसे कमवायचे ठरविले. महेंद्रने आपल्या नावाचे ऑनलाइन सर्वर तयार केले आहे. कुठल्याही छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी लोगो तयार करणे, वेब पेज तयार करणे, ऑनलाइन जाहिरात टाकणे आदी कामे असली, की महेंद्रला संपर्क साधून ती केली जातात. पैशांचे सर्व व्यवहार ऑनलाइन बॅंकिंगने केले जातात. परिसरातील नागरिकांचे, नातेवाइकांचे कुठलेही ऑनलाइन काम महेंद्र करून देतो. अर्थात, त्याचे दोन टक्के कमिशन घेऊन महेंद्र हा स्वयंरोजगारातही पारंगत झाला आहे.
आई-वडिलांनाही धीर... जिल्हा बॅंकेतील निवृत्त अधिकारी काशिनाथ लोहार व आई कुसुम लोहार यांचा महेंद्र एकुलता एक मुलगा आहे. आपल्या मुलाला झालेल्या आजाराने आई- वडील हताश झाले; परंतु महेंद्रनेच त्यांना हिम्मत दिली. आपल्यापेक्षाही वाईट परिस्थिती असणारे लोक त्यांच्या जीवनात कशा प्रकारे यशस्वी आहेत, ते इंटरनेटच्या माध्यमातून दाखवीत त्यानेच उलट आई- बाबांना धीर दिला अन् पुढची आपली वाटचाल निश्चित केली.
आई-बाबा, हताश होऊ नका. मी जसा आहे, तसा आनंदी आहे. माझे असामान्य जीवनही मी सामान्यपणे जगू शकतो, हे मी माझ्या कामातून दाखवून देईन.
- महेंद्र लोहार